Breaking News

महिनाभरापासून पाऊस गायब झाल्यानं मराठवाडा दुष्काळाच्या उंबरठ्यावर

नांदेड/बीड, 09 . ऑगस्ट - मराठवाड्याकडे पावसानं पाठ फिरवल्यानं पीकांनी माना टाकायला सुरुवात केलीय. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून, मराठवाड्यावर दुष्काळाचं संकट आव असून उभं आहे. 8 ऑगस्टपर्यंत मराठवाड्यात बरसलेल्या पावसाची स्थिती पाहिली, तर पुढे काय होणार? हा प्रश्‍न पडतोय. कारण मराठवाड्याच्या बहुतांश भागांत सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने, शेतकर्‍यांची चिंता वाढली आहे.
8 ऑगस्टपर्यंत मराठवाड्यातील 8 जिल्ह्यातील पर्जन्यमान
औरंगाबाद - 31.07 %जालना - 32.00%परभणी - 24.06 %हिंगोली - 30.09%नांदेड - 28.07%बीड - 35.04%लातूर - 35.04%उस्मानाबाद -  31.08%
दरम्यान, पावसानं पाठ फिरवल्यानं औसा तालुक्यातील एका शेतकरी कुटुंबानं सोयबीनच्या पीकावर नांगर फिरवलाय. संजय आणि दयानंद बेगडेंनी आपल्या शेतात  दोन लाख रुपये खर्चून सोयाबीनची पेरणी केली. मात्र आता पावसानं दडी मारल्यामुळं त्यांच्यावर शेतात नांगर फिरविण्याची वेळ आली आहे. दुसरीकडे नांदेडमध्ये  बहार धरण्याच्या स्थितीत पीकं आली, आणि पाऊस गायब झाल्यामुळे आता पीकांनी माना टाकण्यास सुरुवात केली आहे. बीडमध्येही काहीशी अशीच परिस्थिती  आहे. नित्रुडमध्ये तर कापसाला बाटलीभर पाण्याचा आधार आहे, असं काहीसं चित्र आहे. माजलगावमध्येही सादोळा गावच्या तीन एकर सोयाबीनवर नांगर फिरवलाय.  मान्सूनच्या सुरुवातीला पाऊस बरा झाल्यानं, शेतकर्‍यांनी पेरणीला सुरुवात केली. पण आता शेतकर्‍यांचे डोळे आभाळाकडे लागते. नाही म्हणायला रोज ढग येतात.  पण ढगाला काही पाझर फुटत नाही. त्यामुळे मराठवाडा पुन्हा एकदा दुष्काळाच्या उंबरठ्यावर आहे.