Breaking News

नागपुरात 5 वर्षांत 431 जणांचा होरपळून मृत्यू

नागपूर, दि. 07 - राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूर शहरात आगीच्या घटना नवीन नाहीत. मात्र गेल्या काही वर्षांपासून आगीच्या घटनांचे प्रमाण वाढीस  लागले असल्याचे चित्र आहे. गेल्या सव्वापाच वर्षांत नागपूर शहरात साडेचार हजारहून अधिक ठिकाणी आग लागली आणि या घटनांमध्ये थोडेथोडके नव्हे तर 431  नागरिकांचा होरपळून मृत्यू झाला आहे. माहिती अधिकारातून हाती आलेल्या आकडेवारीतून आगीसंदर्भातील हे दाहक वास्तव समोर आले आहे. 
नागपुरातील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी नागपूर महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाकडे माहितीच्या अधिकाराअंतर्गत विचारणा केली होती.  शहरात 2007 पासून किती आगी लागल्या, त्यांचे स्वरुप व त्यापासून झालेले नुकसान, प्राणहानी इत्यादींबाबत त्यांनी प्रश्‍न उपस्थित केले होते. यासंदर्भात त्यांना  प्राप्त झालेल्या अधिकृत माहितीनुसार 1 एप्रिल 2012 ते 30 जून 2017 या कालावधीत नागपुरात 4 हजार 832 आगीच्या घटना घडल्यात. यात मोठ्या स्वरुपाच्या  726 तर मध्यम स्वरुपाच्या 1 हजार 166 आगींची प्रकरणे होती . तर 2 हजार 940 ठिकाणी किरकोळ स्वरुपाची आग लागली होती.