Breaking News

फोंडाघाट येथे एसटी बस अपघातात 32 प्रवासी जखमी

रत्नागिरी, दि. 08, ऑगस्ट - सांगली-देवगड एसटी बसला आज दुपारी सिंधुदुर्ग जिल्ह्यात फोंडाघाट (ता. कणकवली) येथे झाडाला धडकल्याने झालेल्या  अपघातात 32 प्रवासी जखमी झाले. एसटीचा वाहक गंभीर जखमी झाला आहे. सर्व जखमींवर कणकवली आणि सिंधुदुर्गनगरी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात  आले.
फोंडाघाट-हवेलीनगरनजीक सांगली-देवगड एसटी बस आंब्याच्या झाडाला आदळली. हा अपघात दुपारी साडेबाराच्या सुमारास घडला. भरधाव वेगात येणार्‍या ट्रकने  हुलकावणी दिल्याने बसचालकाचा ताबा सुटून बस रस्त्याच्या बाजूला असलेल्या आंब्याच्या झाडाला आदळली. त्यामुळे भीषण अपघात घडला. अपघातात एकूण 32  प्रवासी जखमी झाले. त्यापैकी वाहकासह 10 प्रवासी गंभीर जखमी झाले. अपघातात बसचालकाच्या केबिनचा चक्काचूर झाला. त्यामुळे बसमधील जखमी प्रवाशांना  बाहेर काढण्यास अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ लागला. या बसमध्ये लोरे, वाघेरी, नांदगाव, शिरगाव, देवगड येथील प्रवासी प्रवास करत होते. अपघाताचे वृत्त समजताच  पंचायत समिती सदस्य बबन हळदिवे, संतोष आग्रे, महेश सावंत, अविनाश सापळे, संतोष राणे, राजू रावराणे, पवन भोगले, श्यामल म्हाडगुत, राजू मोर्ये, सागर  भोगले आणि अन्य ग्रामस्थांनी तसेच खाजगी रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी कुलकर्णी, नारकर, गुरव,यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केलेल्या रुग्णांवर  उपचार केले.