Breaking News

22 ऑगस्टला बँक कर्मचार्‍यांचा देशव्यापी संप

नवी दिल्ली, 09 . ऑगस्ट - देशभरातील बँक कर्मचारी येत्या 22 ऑगस्टला संप पुकारणार आहेत. बँकिंग सेक्टरमध्ये सुधारणा आणि इतर मागण्यांसाठी युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सनं (णऋइण) संपाची हाक दिली आहे. युनियनच्या एका बड्या नेत्यानं याबाबत माहिती दिली आहे. देशभरातील नऊ मोठ्या बँक युनियन या संपात सहभागी होणार असल्याची माहिती यूएफबीयूनं दिली आहे. या संपात तब्बल 10 लाख बँक कर्मचारी सहभागी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
यामुळे बँकेच्या व्यवहारांवर मोठ्या प्रमाणात परिणाम होण्याची शक्यता आहे. मात्र, या संपाचा मोबाइल बँकिंग, नेट बँकिंग आणि एटीएम सेवांवर परिणाम होणार  नाही. ऑल इंडिया बँक एप्लॉईज असोसिएशन (एआयबीईए)चे सरचिटणीस सी. एच. वेंकटचलम यांनी याबाबत बोलताना सांगितलं की, ‘आम्ही आधीच संपाची  नोटीस दिली आहे. येत्या 22 ऑगस्टला संपूर्ण बँकिंग सेक्टर संपात सहभागी होणार आहे.’