Breaking News

बालक तस्करीप्रकरणी रुपा गांगुलींना गुन्हे अन्वेषण विभागाकडून नोटीस

नवी दिल्ली, दि. 21, जुलै - भारतीय जनता पक्षाच्या खासदार रुपा गांगुली यांना पश्‍चिम बंगाल गुन्हे अन्वेषण विभागाकडून कथित बालक तस्करी रॅकेटप्रकरणी नोटीस  बजावण्यात आली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी चंदना चक्रवर्तीने बालक तस्करी रॅकेटमध्ये गांगुली सहभागी असल्याचा आरोप केला असून त्या पार्श्‍वभूमीवर  त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. विमला बालगृह या संस्थेची अध्यक्ष असलेल्या चंदनाला बालकांची दत्तक देण्याच्या नावाखाली विक्री करण्याच्या आरोपावरून  फेब्रुवारी महिन्यात ताब्यात घेण्यात आले होते. तिच्या चौकशीतून रुपा गांगुली व भारतीय जनता पक्षाचे पश्‍चिम बंगाल राज्य प्रभारी कैलाश विजयवर्गीय यांचे नाव समोर  आले होते. याशिवाय भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडीच्या नेत्या जूही चौधरी यांच्यावर राजकीय प्रभावाचा वापर करून सरकारी आर्थिक मदत व परवाना  मिळवून दिल्याचा आरोपही करण्यात आला होता.
याप्रकरणी रुपा गांगुलींविरोधात पुरावे असल्याचे अन्वेषण विभागाच्या अधिका-यांनी स्पष्ट केले आहे. संस्थेबाबतचे सरकारी अडथळे दूर करण्यासाठी चौधरी यांनी  चंदनाची दिल्लीतील संबंधीत अधिका-यांशी भेट घालून दिली होती, असे अन्वेषण विभागाकडून सांगण्यात आले.