Breaking News

निमगाव वाघा येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

। जयंतीनिमित्त पक्ष्यांना पिण्यासाठी पाण्याची व्यवस्था

अहमदनगर, दि. 16 - नगर तालुक्यातील निमगाव वाघा येथे नेहरु युवा केंद्र संलग्न स्व.पै.किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, जिल्हा क्रीडा कार्यालय, श्री नवनाथ युवा मंडळ व नवनाथ विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. जयंती निमित्त गावातील झाडांवर प्लॅस्टिक बाटल्या, गाडगे लावून पक्ष्यांना पिण्यासाठी पाण्याची व्यवस्था करण्यात आली. उन्हाळ्यानिमित्त पाण्यासाठी पक्ष्यांचा किलबिलाट होत असताना, त्यांच्या पाण्याची व्यवस्था या उपक्रमाद्वारे गावातील विद्यार्थी करणार आहे. सदर संस्थाच्या वतीने घेण्यात आलेल्या आगळ्या वेगळ्या उपक्रमासाठी ग्रामस्थांनी देखील पुढाकार घेतला आहे. 
प्रारंभी भीमवंदना सादर करुन, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस विद्यालयाचे प्र.मुख्यध्यापक किसन वाबळे व डोंगरे संस्थेचे अध्यक्ष पै.नाना डोंगरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी दत्तात्रय जाधव, चंद्रकांत पवार, तुकाराम खळदकर, मयुर काळे, युवा मंडळाचे अध्यक्ष संदीप डोंगरे, सचिव प्रतिभा डोंगरे, मंदाताई डोंगरे आदिंसह  शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पाहुण्यांचे स्वागत प्रियंका डोंगरे यांनी केले. तृप्ती गायकवाड व निकीता गायकवाड या विद्यार्थिनीने बाबासाहेबांवर पोवाडे सादर केले. मंजुषा जाधव यांनी यांनी आपल्या भाषणात डॉ. बाबासाहेबांच्या जीवनावर प्रकाश टाकून, सामाजिक संदेश दिला.
पै.नाना डोंगरे म्हणाले की, बाबासाहेबांनी भारताला परिवर्तनाची दिशा दिली. जातीयतेच्या चिखलात खितपत पडलेल्या दलित समाजाला न्याय मिळवून दिला. बाबासाहेबांनी भारताला संविधान दिले नाहीतर, प्रगतीपथावर जाण्यासाठी वैचारिक मार्ग दिला. त्यांच्या विचाराने समाजाच्या वैचारिक परिवर्तनाची गरज असल्याचे सांगितले. तसेच कॅशलेस, स्वच्छता व मतदार जागृतीबद्दल त्यांनी मार्गदर्शन केले. नेहरु युवा केंद्राचे जिल्हा युवा समन्वयक बाबाजी गोडसे व जिल्हा क्रीडा अधिकारी उद्य जोशी यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.