Breaking News

सपा स्वबळावर लढण्यासाठी सक्षम, मुलायम सिंहांचा महायुतीला नकार

लखनऊ, दि. 17 - उत्तर प्रदेशचं राजकारण संपूर्ण देशासाठी चर्चेचा विषय आहे. कारण आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं मिशन 2019 रोखण्यासाठी विरोधी पक्ष एकत्र येण्याचे चिन्ह आहेत. तसे संकेतही मिळाले आहेत. मात्र समाजवादी पार्टीचे ज्येष्ठ नेते मुलायम सिंह यादव यांनी कोणत्याही प्रकारची महायुती करण्याची शक्यता फेटाळली आहे.
समाजवादी पार्टी कुणाशीही महायुती करणार नाही. आमचा पक्ष स्वबळावर निवडणूक लढण्यासाठी सक्षम आहे, असं मुलायम सिंह यादव यांनी स्पष्ट केलं. विशेष म्हणजे कालच सपाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी येत्या निवडणुकांमध्ये इतर पक्षांसोबत एकत्र येण्याचे संकेत दिले होते. बसपा अध्यक्ष मायावती यांनी दोन दिवसांपूर्वीच युतीचे स्पष्ट संकेत दिले होते. देशातील लोकशाहीला वाचवण्यासाठी आणि ईव्हीएमच्या घोळाविरोधात केल्या जात असणार्‍या आंदोलनात भाजपचे विरोधी पक्ष आमच्यासोबत आल्यास त्यांच्याशी हातमिळवणी करण्यासा आम्हाला काही हरकत नसेल, असं मायावती म्हणाल्या होत्या. मायावतींनी भाजपला रोखण्यासाठी इतर विरोधीपक्षांना एकत्र येण्याचे संकेत दिले होते. तर उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या निकालाआधी अखिलेश यादव यांनीही भाजपला रोखण्यासाठी मायावतींसोबत जाण्यास हरकत नसेल, असं म्हटलं होतं.