Breaking News

आर्मड कोअर सेंटरचे देशसेवेत मोलाचे योगदानः राष्ट्रपती प्रणव मुखर्जी

नाशिक, दि. 16 - देशाच्या संरक्षणासाठी आर्मड् कोअर सेंटर न्ड स्कूलने  (एसीसीएस) केलेली कामगिरी अतुलनीय आणि बहुमोल आहे. या संस्थेचा इतिहास गौरवशाली आणि देदीप्यमान असून देश संरक्षणासाठी त्याग, समर्पणवृत्तीने केलेले काम मोलाचे आहे, असे प्रतिपादन राष्ट्रपती श्री. प्रणव मुखर्जी यांनी येथे केले.
राष्ट्रपती श्री. मुखर्जी यांच्या हस्ते आज आर्मड् कोअर सेंटर न्ड स्कूलला (एसीसीएस) आतापर्यंतच्या कामगिरीचा सन्मान म्हणून ध्वजप्रदान करण्यात आला. एसीसीएसचे कमांडंट मेजर जनरल प्रवीण दीक्षित यांनी राष्ट्रपती श्री. मुखर्जी  यांच्या हस्ते हा सन्मान स्वीकारला.
यावेळी  लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत, लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल पी.एम. हैरिज, लष्कराच्या प्रशिक्षण केंद्राचे प्रमुख लेफ्टनंट जनरल डी.आर. सोनी, एसीसीएसचे कमांडंट मेजर जनरल दीक्षित, पालकमंत्री प्रा. राम शिंदे, महापौर सुरेखा कदम, खासदार दिलीप गांधी,  विभागीय आयुक्त एकनाथ डवले, जिल्हाधिकारी अनिल कवडे यांच्यासह विविध वरिष्ठ लष्करी अधिकारी उपस्थित होते. श्री. मुखर्जी म्हणाले,  1948 पासून देशसेवेत समर्पित आर्मड कोअर सेंटरने त्याग, समर्पण, व्यावसायिक कौशल्य आणि नि:स्वार्थ सेवेचा आदर्श प्रस्तूत केला आहे. एक शांतताप्रिय देश म्हणून राष्ट्राचे सार्वभौमत्व आणि राष्ट्रीय ऐक्य कायम ठेवण्यासाठी आपल्या क्षमतेचा उत्तमरितीने उपयोग केला आहे. नव्या आव्हानांना तोंड देत कवचीत कोअर भविष्यातही आपली गौरवशाली परंपरा पुढे नेण्यात यशस्वी होईल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.