Breaking News

बोरुडे यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजभुषण पुरस्कार प्रदान

अहमदनगर, दि. 16 - आरपीआय, निलक्रांती चौक व आधार प्रतिष्ठाणच्या वतीने महात्मा फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवानिमित्त सामाजिक कार्यकर्ते जालिंदर बोरुडे यांना सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजभुषण पुरस्काराने गौरविण्यात आले. उपमहापौर श्रीपाद छिंदम यांच्या हस्ते बोरुडे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी महिला कुस्तीपटू अंजली देवकर, दलितमित्र प्रभाकर रुपवते, प्रा.जयंत गायकवाड, आयोजक अजय साळवे, प्रा.भिमराव पगारे, संध्या मेढे, प्रा.बांगर, महेश भोसले, संभाजी भिंगारदिवे, विजय भांबळ आदिंसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 श्रीपाद छिंदम म्हणाले की, डॉ.बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुलेंनी भारताला परिवर्तनाची दिशा दिली. जातीयतेच्या चिखलात खितपत पडलेल्या समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी या महापुरुषांनी आपले आयुष्य खर्च केले. बाबासाहेबांच्या कार्यामुळे समता व न्यायव्यवस्था टिकून आहे. तर महात्मा फुलेंनी मुलींसाठी शिक्षणाचे दार उघडल्याने, सावित्रीच्या लेकी प्रत्येक क्षेत्रात आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवत आहे. बोरुडे यांची सुरु असलेली रुग्णसेवा एक प्रकारे मानवरुपी ईश्‍वरसेवा असल्याचे सांगत त्यांच्या कार्याचे छिंदम यांनी कौतुक केले.
 प्रास्ताविकात अजय साळवे यांनी समाजात निस्वार्थ भावनेने काम करणार्यांचा गौरव होणे अपेक्षित असल्याने, सदर पुरस्कार देण्यात आल्याचे सांगितले. सत्काराला उत्तर देताना जालिंदर बोरुडे म्हणाले की, आरोग्य सुविधा मोठ्या प्रमाणात महागली असून, सर्वसामान्यांना हॉस्पिटलचा खर्च पेळवत नाही. दुबळ्या घटकातील रुग्णांना आरोग्यसुविधा मिळण्याच्या हेतूने विविध आरोग्य शिबीर, नेत्रतपासणी व शस्त्रक्रिया शिबीर घेतले जात आहे. मिळालेल्या पुरस्काराने काम करण्यासाठी अजून प्रोत्साहन मिळाल्याचे त्यांनी सांगितले.