Breaking News

मर्चंटस् बँकेच्या कर्मचार्‍याचा ‘लाखमोलाचा’ प्रामाणिकपणा

अहमदनगर, दि. 16 - भरण्यात जादा आलेली पावणेदोन लाखांची रक्कम ग्राहकास परत
सध्याच्या युगात नितीमत्ता, परोपकार, प्रामाणिकपणा या गोष्टी दुर्मिळ होत असल्याची ओरड होत असते. मात्र काही घटनांमधून समाजात आजही चांगुलपणा कायम असल्याच समोर येते.नगरमधील प्रतिष्ठित बँक म्हणून ओळख असलेल्या अहमदनगर मर्चंटस् को ऑपरेटिव्ह बँकेतील  लिपिक महेंद्र प्रेमसुखलाल लोढा यांनी अशाच प्रकारे प्रामाणिकपणाचे दर्शन घडवत खातेदाराकडून चुकून जास्त आलेली तब्बल पावणे दोन लाखांची रक्कम परत करीत चांगुलपणाचे उदाहरण घालून दिले. बँकेचे संस्थापक संचालक हस्तीमल मुनेात, चेअरमन संजीव गांधी, व्हाईस चेअरमन विजय कोथंबिरे यांच्यासह  सर्व संचालक, वरिष्ठ अधिकार्यांनी लोढा यांचे अभिनंदन केले.
अहमदनगर मर्चंटस् बँकेच्या गुलमोहोर रोड शाखेत स्पीड एज पेट्रोलियम कंपनीचे खाते आहे. या फर्मचे कर्मचारी नेहमीप्रमाणे बँकेत भरणा करण्यासाठी रोकड घेवून आले होते. खात्यात रक्कम टाकण्यासाठी त्यांनी 20 लाख 81 हजार रुपये आणले होते. भरणा करून ते निघून गेले. बँकेतील लिपिक महेंद्र लोढा यांनी रक्कम पाहिली असता त्यात 1 लाख 76 हजार रुपये जास्त असल्याचे आढळून आले. त्यांनी तात्काळ सदर बाब शाखाधिकारी सुनील मुथा यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानुसार शाखाधिकार्यांनी संबंधित खातेदाराशी संपर्क साधून माहिती दिली व जादा आलेली रक्कम त्यांना सुपुर्द केली. लोढा यांच्या लाखमोलाच्या प्रामाणिकपणामुळे संबंधित खातेदारानेही आनंद व्यक्त व त्यांचा सत्कार केला. यावेळी शाखाधिकारी सुनील मुथा, अधिकारी बालचंद्र ठोके, सागर बक्षी, धनंजय हिरवे, व्दारकानाथ गिल्डा, जितेेंद्र सुरपुरिया, मंगेश मेहेर, पवन कुंभारे, श्याम वडागळे,जयश्री साळवे, सोनाली गायकवाड, राहुल लोढा, केतन गांधी, अतुल पादीर, संतोष वाघमारे, शेख मेजर आदी उपस्थित होते.