Breaking News

आंबेडकर जयंतीचा खर्च टाळून गरजू नववधूला आर्थिक मदत

अहमदनगर, दि. 17 - लातूरच्या शीतल वायाळ या तरुणीने हुंड्यासाठी पैसे नसल्याने मृत्यूला कवटाळलं. शीतलच्या मृत्यूने समाजातील अनिष्ट रुढी परंपरा चव्हाट्यावर आल्या. मात्र अहमदनगरला भीमशक्ती सामाजिक संघटनेने आंबेडकर जयंतीचा खर्च टाळून गरजू नववधूला आर्थिक मदत केली आहे. या निर्णयाचं सर्वत्र कौतुक होत आहे.
अहमदनगरच्या भीमशक्ती संघटनेने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साधेपणाने साजरी केली. बँड, मिरवणूक, डीजे यांचा खर्ज टाळून तो पैसा एका गरजू कुटुंबाला दिला. भीमशक्ती संघटनेने गाडेकर कुटुंबातील गरजू मुलीच्या लग्नाला रोख सोळा हजाराची आर्थिक मदत केली. त्यामुळे बाबासाहेबांच्या जयंतीचा खरा उद्देश सफल झाला आहे. मात्र अशीच मदत शीतल वायाळला कोणी केली असती तर तिचाही जीव वाचला असता.
वांबोरी हे साधारण वीस हजार लोकसंख्येचं गाव आहे. गावातच दत्तात्रय गाडेकर यांचं पत्नी आणि मुलांसह कुटुंब राहतं. हातावर पोट भरणार्‍या या कुटुंबाला आजाराने ग्रासलंय. पत्नीला कर्करोग, तर पतीला पित्ताशयाचा आजार झाला आहे. उपचारासाठीच पैसे नसल्याने मुलीच्या लग्नासाठी पैसे कुठून आणायचे, असा प्रश्‍न गाडेकर कुटुंबासमोर आहे. मात्र भीमशक्ती संघटनेच्या मदतीने त्यांचं ओझं जरासं का होईना कमी झालं आहे.