Breaking News

खरीप हंगामात अधिकार्‍यांनी दक्षता घ्यावी - पालकमंत्री प्रा. शिंदे

। अनुदान थेट खात्यामध्ये जमा केले जाणार 

अहमदनगर, दि. 16 - खरीप हंगामात आता नव्या शासन निर्णयानुसार लाभार्थी शेतकर्‍यांनी खते, बियाणे खरेदी केल्यानंतर त्यांचे अनुदान थेट खात्यामध्ये जमा केले जाणार आहे. या बाबीचा विचार करता खते, बियाणांच्या बाबतीत शेतकर्‍यांची फसवणूक होवू नये याची दक्षता कृषि विभागाने घ्यावी अशी सूचना करीत सतर्क राहून शेतकर्‍यांना दिलासा द्यावा लागेल असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे जलसंधारणमंत्री प्रा. राम शिंदे यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनाच्या सभागृहात जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे जलसंधारणमंत्री प्रा. राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली अहमदनगर जिल्ह्याची सन 2017-18 ची खरीप हंगामपूर्व आढावा व नियोजन बैठक संपन्न झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शालीनीताई विखे, जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा सौ. राजश्री घुले, खासदार दिलीप गांधी, आमदार विजय औटी, आमदार बाळासाहेब मुरकूटे, आमदार स्नेहलता कोल्हे, जि.प.च्या महिला व बालकल्याण सभापती सौ. अनुराधा नागवडे, नगर तालुका पंचायत समिती सभापती रामदास भोर, पारनेर तालुका पंचायत समिती सभापती राहुल झावरे, जि.प. सदस्य अजय फटांगरे, जिल्हाधिकारी अनिल कवडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रविंन्द्र बिनवडे, पुणे कृषि संचालक एस.एल. जाधव, पुणे कृषि सहसंचालक विजय इंगळे आदी उपस्थित होते.
पालकमंत्री प्रा. राम शिंदे म्हणाले की, कृषीशी सलग्न असलेल्या विविध योजनांवरील प्रलंबित अनुदानासाठी लाभार्थी शेतक-यांचे उद्दिष्ठ लक्षात ठेवून निधीची मागणी करावी. जलयुक्त शिवार अभियान योजनेत सन 2017-18 या तिसर्‍या वर्षात जिल्ह्यात निवडलेल्या गावातील कामांचा आराखडा लोकप्रतिनिधी व ग्रामस्थ याना एकत्रित घेवून तयार करावा. जलयुक्तच्या कामासाठी निधीची कमतरता भासणार नाही असे ही त्यांनी सांगितले.
बैठकीच्या प्रारंभी जिल्हा कृषि अधिक्षक अधिकारी पंडीतराव लोणारे, आत्माचे प्रकल्प संचालक भाऊसाहेब बर्‍हाटे यांनी खरीप हंगाम नियोजनाची माहिती दिली. बैठकी दरम्यान झालेल्या चर्चेत जिल्हा परि षद अध्यक्ष शालीनीताई विखे, खासदार दिलीप गांधी, आमदार विजय औटी, आमदार बाळासाहेब मुरकूटे, आमदार स्नेहलता कोल्हे, सभापती रामदास भोर आदींनी चर्चेत सहभाग घेतला.