Breaking News

येत्या चार दिवसात विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा

मुंबई, दि. 17 - येत्या चार दिवसात विदर्भाच्या बहुतांश भागात उष्णतेची लाट असेल, असा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे. 17 आणि 18 एप्रिलला म्हणजे येत्या 48 तासात धुळे, नाशिक, जळगाव, अहमदनगर, सातारा, सोलापूर आणि मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये तापमान जास्त राहणार असल्याचं हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे.
दरम्यान, एरव्ही मे महिन्यात तापणारा विदर्भ यंदा एप्रिलमध्येच गरमागरम झाला आहे. चंद्रपुरातल्या ब्रह्मपुरीमध्ये 45.9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली असून लवकरच हा आकडा 48 अंशांवर पोहोचण्याची शक्यता हवामान खात्यानं व्यक्त केली आहे. राजस्थान तसंच गुजरातमधून येणार्‍या उष्ण वार्‍याचा परिणाम विदर्भात जाणवू लागला असून ज्या भागात वारे अधिक त्या भागात तापमानही अधिक नोंदवलं जातं आहे. आधी वर्धा मग नागपूर आणि आता चंद्रपुरात तापमान 45 च्या पार पोहोचलं आहे. यापूर्वी मे 2013 मध्ये चंद्रपुरात 48 अंश सेल्सिअसची नोंद करण्यात आली होती.