Breaking News

15 हजार गाड्या, 11 किमी लांबीची रॅली, मोदींचा सूरतमध्ये मेगा रोड शो

सूरत, दि. 17 - पंतप्रधान झाल्यानंतर नरेंद्र मोदींनी पहिल्यांदाच सूरतमध्ये पाऊल ठेवलं. 11 किलोमीटर लांबीच्या रोड शोमध्ये मोदी सहभागी झाले. या रॅलीमध्ये 15 हजार दुचाकींचा समावेश आहे. यामध्ये 90 महिला दुचाकीस्वार आहेत. सूरत विमानतळापासून सुरु झालेल्या या मेगा रोड शोमध्ये मोदींनी खुल्या जीपमधून प्रवास केला. रोड शोसाठी संपूर्ण सूरत शहरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मोदी मोदीच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला.
मोदींचं सूरतमध्ये भव्य स्वागत करण्यात आलं. यासाठी संपूर्ण शहर विमानतळापासून ते विश्रामगृहापर्यंत सजवण्यात आलं होतं. रस्त्याच्या दुतर्फा रोषणाई करण्यात आली आहे. मोदींचा मुक्काम सूरतच्या विश्रामगृहामध्येच असणार आहे. स्थानिक भाजप नेत्यांसोबत मोदी रात्री संवाद साधतील. त्यानंतर ते सोमवारी विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होतील.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टीने दक्षिण गुजरातमध्ये भाजपला अधिक बळकट करण्यासाठी मोदींचा हा दौरा असल्याचं मानलं जातं. म्हणूनच पाटीदार समाजाचे वर्चस्व असलेल्या डायमंड सिटीत म्हणजे सुरतमध्ये मोदींनी रोड शो घेतला. आरक्षणावरून नाराज असलेल्या पाटीदार समाजाचं मन वळवण्याचा प्रयत्न मोदी या दौर्‍यात करणार आहेत. भाजपने मोदींच्या नेतृत्वात गुजरात विधानसभेच्या निवडणुकीची जोरदार तयारी सुरु केली आहे. हे शक्तीप्रदर्शन त्याचाच एक भाग आहे. ओदिशा विधानसभा निवडणुकीची तयारी म्हणून काल भाजपच्या वतीने भुवनेश्‍वरमध्ये भव्य रोड शोचं आयोजन करण्यात आलं होतं. भुवनेश्‍वरमध्ये भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक पार पडली.