माजी आमदार लक्ष्मण मानेंसह सातजणांविरोधात गुन्हा दाखल
फलटण, दि. 30 (प्रतिनिधी) : शेती महामंडळाच्या जागेत पक्की घरे बांधण्यासाठी बांधकामाचे साहित्य टाकून पोल रचल्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी माजी आमदार लक्ष्मण माने यांचेसह सातजणांविरोधात फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. फलटण तालुक्यात मुरूम, निंभोरे, सांगवी, साखरवाडी, जिंती, सोनगाव, सरडे या गावात शेती महामंडळाची जमिन आहेत. सोमवारी पाच सर्कल साखरवाडी, ता. फलटण येथे व वरील गावांमधील शेती महामंडळाच्या जमिनींमध्ये समाजवादी शेतकरी शेतमजूर पंचायत महाराष्ट्र संघटनेचे अध्यक्ष व माजी आमदार लक्ष्मण माने यांचे सांगण्यावरून व शेती महामंडळाच्या जमिनींवर पक्की घरे बांधण्यासाठी सिमेंट पत्रे, पाईप, अँगल व इतर बांधकामाचे साहित्य तसेच पोल रोवण्याचे काम सुरु होते. ही बाब शेती महामंडळाचे स्थावर व्यवस्थापक शिवाजी भोसले यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी फलटण ग्रामीण पोलिसात तक्रार दाखल केली. त्यानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास हवालदार टिळेकर करत आहेत.