Breaking News

भारतातही दहशतवादी हल्ले करा !

मुस्लिमांना उद्देशून अल-कायदाचे चिथावणीखोर वक्तव्य 

नवी दिल्ली, दि. 04 - ढाकामध्ये दहशतवादी हल्ला झाल्याच्या एका दिवसानंतर अल-कायदा या दहशतवादी संघटनेने भारतीय मुस्लिमांना देशात युरोपप्रमाणे एकट्याने हल्ला (लोन वूल्फ ऍटॅक्स) करण्याचे आवाहन केले आहे. विशेष म्हणजे युरोपात हल्ले करणार्‍यांनी इसीसपासून प्रभावित होऊन एकट्याने दहशतवादी हल्ले घडवून आणले आहे. इसीस भारतामध्येही अशा प्रकारचे हल्ले करण्यासाठी असे चिथावणीखोर वक्तव्य केले आहे. 
भारतातील मुस्लिमांना आता पुढे आले पाहिजे, युरोपप्रमाणे भारतातही प्रशासन आणि पोलीस अधिकार्‍यांची हत्या केली पाहिजे’, असे भडकाऊ वक्तव्य अल-कायदाचा भारतीय उपखंडातील प्रमुख असीम उमर याने केले आहे. अल-कायदा गेली 2 वर्ष भारतामध्ये दहशतवादी कारवाया घडवून आणण्यासाठी भारतीयांना आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत आहे. पण अजूनपर्यंत त्यांना हवे तसे यश मिळालेले नाही.
अल-कायदा आणि इसीस भारतात हल्ले करण्यासाठी भारतीयांना भरती करण्याचा प्रयत्न करत असल्याच्या पार्श्‍वभुमीवर गुप्तचर यंत्रणाही सज्ज झाली आहे.
अल-कायदा एकटे हल्ले करण्यासाठी ओळखली जात नाही. मात्र भारतीय उपखंडात इसीसची वाढती लोकप्रियता पाहता अल-कायदा या पर्यायाचा विचार करत असल्याची शक्यता तज्ञांनी व्यक्त केली आहे. भारतीय उपखंडातील अल-कायदा आणि इसीसमधील शत्रुत्व जगजाहीर आहे. दोन्ही दहशतवादी संघटना उपखंडात मुख्यत: भारत आणि बांगलादेशमध्ये आपले अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. पाकिस्तानधील दहशतवादी संघटनांनी याठिकाणी आपले वर्चस्व निर्माण केले होते. अल-कायदा आणि इसिस एकट्याने हल्ला करण्यावर भर देत आहेत. कारण मुख्यत: भारतात त्यांनी हवे तसे जाळ पसरता आलेले नाही. एकट्याने हल्ला केल्यास त्या व्यक्तीच्या हालचालींवर लक्ष ठेवणे कठीण होऊन जाते. ज्याप्रमाणे ओरलांडो हल्ल्यात अमेरिकी अधिकार्‍यांनी ओमर मतीनबद्दल काहीच ठावठिकाणा लागला नव्हता. भारतीय जर अशाप्रकारच्या हल्ल्यांकडे आकर्षित झाले तर यामुळे खुप मोठा धोका निर्माण होऊ शकतो’, असे मत गुप्तचर खात्यातील अधिकार्‍यांनी व्यक्त केले आहे.