Breaking News

राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच !

7 किंवा 9 जुलैला होण्याची शक्यता 

मुंबई, दि. 04 - केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारापाठोपाठ राज्यातही मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असून, यामध्ये भाजपसह मित्रपक्षांच्या सदस्यांना मंत्रिमंडळात स्थान दिले जाणार आहे. मंत्रिमंडळात कोणाला स्थान द्यायचे, यासंदर्भात चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोमवारी नवी दिल्लीमध्ये पोहोचले असून, ते भाजप अध्यक्ष अमित शहा यांची भेट घेणार आहेत. मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा करून नावे निश्‍चित करण्यासाठीच ही भेट होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार 7 किंवा 9 जुलैला होणार असून, त्याची तारीख आजच निश्‍चित करण्यात येणार आहे.
भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या राजीनाम्यानंतर त्यांच्याकडील महसूल, कृषी यासारखी महत्त्वाची खाती कोणाकडे द्यायची. त्याचबरोबर भाजपचे मित्रपक्ष असलेल्या पक्षांचे नेते महादेव जानकर, सदाभाऊ खोत, विनायक मेटे यांना मंत्रिमंडळात संधी द्यायची का, त्यांच्याकडे कोणती खाती द्यायची यावर मुख्यमंत्री आणि अमित शहा यांच्यामध्ये होणार्‍या बैठकीत चर्चा होणार आहे. तसेच उस्मानाबादमधून विधान परिषदेवर निवडून गेलेले भाजपचे ज्येष्ठ नेते सुजितसिंह ठाकूर आणि सांगलीतील शिराळ्याचे आमदार शिवाजीराव नाईक यांना संधी मिळण्याची शक्यता असल्याचे समजते.
मंत्रिपदासाठी लाचार होणार नाही
उद्धव ठाकरे यांचा आक्रमक पवित्रा
केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार उद्यावर येऊन ठेपला असला
तरी भाजपकडून शिवसेनेशी कोणत्याही प्रकारची चर्चा करण्यात आलेली नाही. याविषयी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकर यांनी सोमवारी पत्रकारपरिषदेत स्पष्टपणे आपली नाराजी व्यक्त करत, मंत्रिपदासाठी लाचार होणार नाही असे सांगत, पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतला आहे. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मी काहीच ठरवलेले नाही. शिवसेना कोणाकडेही मंत्रिपद मागायला गेलेली नाही आणि जाणारही नाही. आम्हाला राज्यमंत्रिपद नको, हे मी गेल्याचवेळी स्पष्ट केले होते. अशा तुकड्यांवर बोळवण होणे शिवसेनेला मान्य नाही. त्यामुळे शिवसेना मंत्रिपदासाठी कधीही लाचार होऊन भीक मागणार नाही, असे उद्धव यांनी स्पष्टपणे सांगितले. शिवसेना हा स्वाभिमानी पक्ष आहे. आम्हाला भीक नको. मात्र, आमच्या हक्काचे आहे ते घेऊच, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.