केंद्रीय मंत्रिमंडळाचा मंगळवारी विस्तार !
महाराष्ट्रातून रामदास आठवलें, सुभाष भामरे यांची नावे चर्चेत
नवी दिल्ली, दि. 04 - अनेक महिन्यापासून चर्चेत असणार्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बहुप्रतीक्षित विस्ताराला अखेर मुहूर्त सापडला असून, मंगळवारी सकाळी 11 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली मंत्रिमंडळात फेरबदल होणार आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मंत्रिमंडळात फेरबदल आणि विस्तार होणार असून, काही मंत्र्यांना डच्चू मिळण्याची शक्यता आहे, तर काहींचा नव्याने समावेश होईल. नव्या मंत्र्यांमध्ये उत्तर प्रदेशाचा वरचष्माा राहणार असून महाराष्ट्रातून रामदास आठवले व धुळ्याचे भाजपचे खासदार सुभाष भामरे यांची नावे चर्चेत असून उद्याच्या शपथविधीमध्ये त्यांच्या नावाचा समावेश असल्याचे वृत्त आहे.मोदींनी गेल्या गुरूवारी स्वत: सर्व मंत्र्यांच्या कामाचा आढावा घेतला होता. या बैठकीनंतर मंत्रिमंडळ विस्तार आणि फेरबदलाच्या चर्चेला उधाण आले. उत्तर प्रदेशातील आगामी विधानसभा निवडणूक लक्षात घेता तेथील किमान दोन मंत्र्यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता आहे. भाजपच्या मंत्रिमंडळात सध्या दोन जागा रिक्त आहेत. भाजपचे सर्वानंद सोनवाल यांना आसामचे मुख्यमंत्रीपद दिल्याने क्रीडा राज्यमंत्रीपद रिक्त आहे.
मुख्तार अब्बास नक्वी, पियूष गोयल आदींना कॅबीनेटपदी बढती मिळण्याचे संकेत असून नजमा हेप्तुल्ला, गिरीराजसिंह, निहालचंद आदींना नारळ दिला जाऊ शकतो. आठवलेंचा समावेश झाल्यास त्यांच्या 2 वर्षांतील प्रयत्नांना यश मिळू शकते. अन्य संभाव्य नावांत उत्तर प्रदेशातून अनुप्रिया पटेल, महेंद्रनाथ पांडे व कृष्णा राज यांची वर्णी लागेल. यातील पटेल या अपना दल हा पक्षच भाजपमध्ये विसर्जित करू शकतात. या राज्यात भाजपचे मिशन 267 तडीस नेण्यासाठी त्यांच्यासह पांडे व राज हे अनुक्रमे ब्राम्हण व दलित मतपेढी मायावतींपासून फोडण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. याशिवाय संघाचे राम माधव (काश्मीर प्रभारी) अर्जुन राम मेघवाळ (राजस्थान) एस एस अहलुवालिया (दार्जिलींग), पुरूषोत्तम रूपाला (गुजरात), अजय टामटा (उत्तराखंड) आदींचा संभाव्य नावांत समावेश आहे. यातील काहींनी सोमवारी सकाळीच शहा यांची भेट घेतली.
