Breaking News

50 हजाराची लाच घेणार्‍या महिला डॉक्टरसह पतीस अटक

सातारा, दि. 4 (प्रतिनिधी) : वैद्यकिय रजेवरुन कर्तव्यावर हजर करुन घेण्याकरीता 50 हजार रुपयाची लाच स्विकारल्याप्रकरणी तसेच इलेक्ट्रॉनिक साहित्य व मोबाईल फोन काढून घेवून त्याची मोडतोड केल्याने वाई तालुक्यातील बावधन प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. आशा गिन्यानदेव बांगर (वय 34, वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र बावधन, ता. वाई, जि. सातारा, मूळ गाव, पुसद, जि. यवतमाळ) व पती अंकुश काळुराम जाधव या दोघांना सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली.
तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार वैद्यकिय रजेवरुन कर्तव्यावर हजर करुन घेण्याकरीता डॉ. आशा गिन्यानदेव बांगर  यांनी 1 लाख रुपयाच्या लाचेची मागणी केल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सातारा कार्यालयात दाखल झाली होती. पडताळणीमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र बावधन येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. आशा बांगर यांनी वैद्यकीय रजेवरुन हजर करुन घेण्यासाठी तडजोडीअंती 50 हजार रुपयाची लाच देण्याचे ठरले. याचा सुगावा डॉ. बांगर यांचे पती अंकुश जाधव यांना लागल्याने त्याने तक्रारदाराजवळील मोबाईल व इलेक्ट्रॉनिक्स साहित्य जबरदस्तीने हिसकावून घेऊन नदीत फेकून देऊन पुरावा नष्ट केला. याप्रकरणी डॉ. बांगर व त्यांच्या पतीला अटक करण्यात आली आहे. दरम्यान, त्यांना न्यायालयात हजर केले असता दि. 6 पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले.  या प्रकरणाचा तपास एसीबीचे उपअधीक्षक सुहास नाडगौडा, पोलीस निरीक्षक बयाजी कुरळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आरीफा मुल्ला करत आहेत.