Breaking News

कुकडीला सुभाष कोळींच्या भ्रष्टाचाराचे जाळे - काँग्रेस ओबीसी सेलने केली चौकशीची मागणी


 अहमदनगर/प्रतिनिधी । 29 - जलसंपदा विभागाच्या कुकडी प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता सुभाष कोळी यांनी वर्षानुवर्ष अहमदनगर जिल्ह्यात आपल्या बैठकीची ‘मांड’ पक्की केल्याने कुकडी प्रकल्पाला भ्रष्टाचाराचे जाळे लागल्याची चर्चा आहे. यासंदर्भात काँग्रेस ओबीसी सेलने आक्रमक भुमिका घेतली असून उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे.
जलसंपदा विभागात शाखा अभियंता म्हणून अहमदनगर जिल्ह्यातून आपल्या कारकिर्दीची सुरूवात करणारे सुभाष कोळी कार्यकारी अभियंतांपर्यंत पोहचले तरी बदली करून घेण्याचे नाव घेत नाहीत. एरवी प्रशासनात कुठल्याही विभागात काम करणारे प्रामाणिक अधिकारी 3 वर्षांपेक्षा जास्त काळ अहमदनगर जिल्ह्यात सेवा देण्यास धजावत नाहीत. शाखा अभियंता, उपअभियंता आणि आता कार्यकारी अभियंता पदापर्यंत मजल दरमजल करणारे सुभाष कोळी मात्र अहमदनगर जिल्ह्यात मिळणारी ‘उब’ सोडायला तयार नाहीत. आजपर्यंत एकाच जिल्ह्यात सारे प्रमोशन मिळविणारे कोळी चांगलेच रमल्याची चर्चा आहे.
अहमदनगर जिल्ह्यात त्यांनी मारलेली बैठकींची ‘मांड’ इतकी घट्ट कशी? या प्रश्‍नाला सिंचन घोटाळ्याच्या अहवालात उत्तर सापडते असा उपहासही ऐकायला मिळत आहे. कुकडी प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता म्हणून कार्यरत असलेले सुभाष कोळी यांनी विणलेल्या भ्रष्टाचाराच्या जाळ्यातून कोट्यवधी रूपयांची संपत्ती गोळा केल्याचे आरोप होत आहेत, वेगवेगळ्या विकसीत आणि विकसनशिल शहरांमध्ये स्थावर आणि जंगम मालमत्तेच्या माध्यमातून कोट्यवधीचा भ्रष्ट पैसा त्यांनी गुंतविला आहे. त्यांच्या मालमत्तेची उच्चस्तरीय चौकशी व्हावी यासाठी काँग्रेस ओबीसी सेलने आक्रमक भुमिका घेतली असून उच्चस्तरीय चौकशी करावी अशी मागणी काँग्रेस ओबीसी सेलचे प्रदेश उपाध्यक्ष अशोक सोनवणे यांनी लोकायुंक्तांकडे केली आहे.