Breaking News

तालुक्यात स्मार्ट व्हिलेज संकल्पना राबविणार ः सुरेश गोरे

 राजगुरूनगर (प्रतिनिधी)। 29 - ग्रामपंचायत केंद्रबिंदू मानून राज्य शासनाची वाटचाल सुरु आहे. राज्यातील ग्रामपंचायती सक्षम करण्यावर भर आहे. त्यामुळे ’स्मार्ट सिटी’ योजनेच्या धरतीवर राज्यात ‘स्मार्ट व्हिलेज’ संकल्पना राबवण्यात येत असून खेड तालुक्यातील अधिकाधिक गावे यात समविष्ट करून त्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत, असे प्रतिपादन खेडचे आमदार सुरेश गोरे यांनी नाणेकरवाडी येथे केले.
चाकण लगतच्या नाणेकरवाडी आणि मेदनकरवाडी परिसरातील लाखो रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन विविध भागात करण्यात आले. खेडचे आमदार सुरेश गोरे यांच्या आमदार निधीतून मंजूर झालेल्या विविध कामांचा शुभारंभ करण्यात आला. यामध्ये नाणेकरवाडी ते महामार्ग दरम्यानच्या रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले,  त्यासाठी 20 लाख रुपये आमदार गोरे यांच्या निधीतून मंजूर करण्यात आले आहेत. रस्त्यांच्या काँक्रीटीकरणाच्या कामाचे भूमिपूजन , त्याचप्रमाणे मेदनकरवाडी येथे विजय ऑईल मिल ते बंगला वस्ती दरम्यानच्या 20 लाख रुपये खर्चाच्या रस्त्याचे भूमिजन करण्यात आले. या वेळी मार्गदर्शन करताना आमदार गोरे बोलत होते. पुढे बोलताना आमदार गोरे म्हणाले की , स्मार्ट सिटीच्या धरतीवर स्मार्ट व्हिलेज ही संकल्पना ग्रामीण भागात राबवण्यात येत आहे. अपारंपारिक उर्जेचा वापर, कचरा व्यवस्थापन, गावातच रोजगार निर्मिती या सगळया गोष्टी केल्या तरच गावाच्या वैभवात भर पडेल. गावे संपन्न व स्मार्ट होतील. त्यामध्ये खेड तालुक्यातील अधिकाधिक गावे स्मार्ट करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.यावेळी जिल्हापरिषद सदस्य किरण मांजरे यांनी परिसरातील कोट्यावधी रुपयांच्या सुरु असलेल्या विविध विकास कामांचा तपशील आपल्या भाषणात दिला.  या कार्यक्रमासाठी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख शिवाजी वर्पे , तालुकाप्रमुख प्रकाश वाडेकर, महिला आघाडीच्या विजया शिंदे, नंदाताई कड, लक्ष्मण जाधव, सुभाष मांडेकर, नाणेकरवाडीचे सरपंच सुनील नाणेकर , उपसरपंच प्रतिभा जाधव,  चाकणच्या नगराध्यक्षा पूजा कड व उपनगराध्यक्ष राजेंद्र गोरे, महेश जाधव, सुरेशमहाराज नाणेकर,  आदींसह चाकण नगरपरिषदेचे नगरसेवक परिसरातील विविध गावांचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, पदाधिकारी आणि कार्यकर्ते व नाणेकरवाडी, मेदनकरवाडीसह चाकण पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नाणेकरवाडीचे सरपंच सुनील 
नाणेकर यांनी प्रास्ताविक करून उपस्थितांचे आभार मानले.