Breaking News

राज्ये मजबूत झाल्यास देशाचा विकास - योगेंद्र यादव

 पुणे (प्रतिनिधी)। 29 - “विविधतेत एकता या संकल्पनेवर आधारित आपला देश आहे. एक धर्म, एक भाषा, एक राष्ट्र ही युरोपियन संस्कृती भारतात उपयुक्त नाही. भाषेतील विविधता, संविधान व धार्मिक विविधतेचा स्वीकार आणि स्थानिक राजकारण या चार गोष्टींचा स्वीकार आपण केला आहे. त्यामुळे राज्यांनी जबाबदारीने देश पुढे नेण्याची आवश्यकता आहे. राज्ये मजबूत झाली, तर देश आपोआप विकासाचे ध्येय गाठेल,’’ असे मत ज्येष्ठ राजकीय विचारवंत योगेंद्र यादव यांनी व्यक्त केले.
माईर्स एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट व भारतीय छात्र संसद फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सहाव्या भारतीय छात्र संसदेत ‘देशाच्या मजबुतीकरणात राज्यांचे योगदान’ या विषयावर ते बोलत होते. याप्रसंगी त्यांच्या हस्ते ‘आदर्श युवा आमदार पुरस्कार’ आणि ‘उच्चशिक्षित आदर्श युवा सरपंच पुरस्कार’ही प्रदान करण्यात आले. आंध्रप्रदेशतील उंडीचे आमदार वेटूकुरी वेंकटा शिवा रामा राजू आणि राजस्थानमधील गंगानगरच्या आमदार कामिनी जिंदल यांना आदर्श युवा आमदार पुरस्कार, तर पुणे जिल्ह्यातील मेदनकरवाडीच्या सरपंच प्रियांका मेदनकर, वाशिमच्या सरपंच सोनाली जोगदंड, राजस्थानमधील फरोडच्या सरपंच फरोदा चौधरी, जळगाव अमळनेरच्या सरपंच अंकिता पाटील, हिमाचल प्रदेशमधील चंदना गावाचे सरपंच सुरेंदर सिंग, राजस्थानच्या लिलावली गावाच्या सरपंच वसुंधरा चौधरी यांना उच्चशिक्षित आदर्श युवा सरपंच पुरस्काराने गौरविण्यात आले.
याप्रसंगी व्यासपीठावर दिल्ली विधानसभेचे अध्यक्ष रामनिवास गोयल, जे. के. लक्ष्मीपथ विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. रोशनलाल रैना, ज्येष्ठ वीणावादक पंडित विश्‍वमोहन भट, जमायत उल्मा-ए-हिंदचे सरचिटणीस मौलाना मेहमुद मदानी, माईर्स एमआयटीचे उपाध्यक्ष व भारतीय छात्र संसदेचे प्रमुख समन्वयक राहुल कराड यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. योगेंद्र यादव म्हणाले, “राज्ये मजबूत झाली, तर देश कमकुवत होईल, ही धारणा चुकीची आहे. प्रादेशिक राजकारणाने देशाला लोकतांत्रिक ताकद दिली आहे. त्यामुळे स्थानिक राजकीय पक्ष हे देशाला आणखी मजबूत करतील. वाढत्या राज्यांची संख्या सशक्त भारताच्या निर्मितीमध्ये महत्वाचे योगदान देतील. जम्मू-काश्मीर, मणिपूर, नागालँड यांना देखील हक्क मिळायला हवे. प्रत्येक राज्याच्या विधानसभांनी कायदे पाळून कामकरायला हवे.’’मौलाना मेहमुद मदानी म्हणाले, “जगासमोर आतंकवादाचे मोठे आव्हान आहे. इस्लामसह कोणताही धर्म अन्याय आणि अत्याचाराची शिकवण देत 
नाही. देशातील मुस्लिमांसाठी राहण्यासाठी भारतासारखी इतरत्र कोणतीही चांगली जागा नाही. आतंकवादविरोधातल्या लढाईत मुस्लिमांनी सक्रीय सहभागी व्हायला हवे. अनेकदा इस्लामची बदनामी होत असून, एकमेकांना चांगल्या गोष्टींसाठी मदत करणे, हाच खरा इस्लामआहे. धर्म ही थोपविण्याची गोष्ट नसून देशवासी कोणत्याही चुकीच्या गोष्टींना थारा देणार नाहीत.’’विश्‍वमोहन भट म्हणाले, “देशातील विविधता आणि लोकशाहीची जपणूक करुन देशाच्या विकासासाठी तरुणाईने सशक्तपणे पुढे यायला हवे. भारतातील 
युवाशक्ती मोठी असून, देशाला पुढे नेण्यात ती मोठा वाटा उचलणार आहे. ’’गोयल म्हणाले, “युवकांनी आपण ठरविलेले ध्येय पूर्ण करण्याच्या दृष्टीने वाटचाल क रायला हवी. आपल्या ध्येयावर विश्‍वास ठेऊन कामके
ल्यास देश नक्कीच पुढे जाईल. राज्यांना मजबूत करायचे असेल तर गावांपासून सुरुवात करायला हवी. त्याकरीता गाव आणि राज्यांच्या अधिकारांबाबत देखील विचार करण्याची आवश्यकता आहे. ’’
डॉ. रोशनलाल रैना म्हणाले, “भारताकडे प्रगतशील नाही, तर प्रगत राष्ट्र म्हणून पाहायला हवे. एकविसावे शतक हे ज्ञानाचे युग आहे. यामध्ये भारतातील युवकांचे योगदान मोठया प्रमाणात राहणार आहे. त्यामुळे राजकारणातदेखील सहभागी होत देशाच्या विकासासाठी पुढाकार घ्यायला हवा.’’ नीलम शर्मा यांनी सूत्रसंचालन केले.