Breaking News

हेमा मालिनीं यांना कोट्यवधीचा भूखंड अवघ्या 70 हजारात

मुंबई, 29 - भाजप खासदार आणि अभिनेत्री हेमा मालिनी यांना मुंबईतल्या महागड्या भूखंडाची स्वस्तात खैरात करण्यात येणार असल्याची बाब, माहिती अधिकारात उघड झाली आहे.
अंधेरीतील ओशिवरा परिसरातील 2 हजार स्क्वेअर मीटर जागा हेमा मालिनींच्या नाट्य विहार केंद्राला फक्त 70 हजारात देण्यात येणार आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी यासंदर्भातली माहिती मागितली होती. त्यानंतर त्यांना ही माहिती मिळाली आहे. विशेष म्हणजे ही जागा बागेसाठी आरक्षित आहे. आणखी धक्कादायक बाब म्हणजे या जमिनीसाठी 1976च्या दर लावण्यात आला आहे. 35 रुपये प्रती चौरस मीटर एवढा आकारण्यात आला आहे. एकीकडे आरक्षित जागा सुरक्षित ठेवण्यात येईल अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी घेतल्यावर अशा प्रकारे भाजपच्याच खासदारांना स्वस्तात जमीन कशी दिली जाऊ शकते हा प्रश्‍न उपस्थित होतो आहे.